बातम्या

आयएमएचे डॉ. यतिन जाधव, डॉ. अब्बास जबले, डॉ. कांचन मदार यांना राज्यस्तरीय पुरस्कार.

चिपळूण (ओंकार रेळेकर): आयएमए चिपळूण आणि लोटिस्माचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध त्वचाविकार चिकित्सक डॉ. यतिन जाधव, उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध अस्थीविकार चिकित्सक डॉ. अब्बास जबले आणि सुप्रसिद्ध स्त्री विकार तज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना आयएमए महाराष्ट्रचा यावर्षीचा सर्वात प्रतिष्ठेचा प्रेसिडेंट अॅप्रेसिएशन अॅवॉर्ड हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या आयएमए चिपळूणच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल नुकताच राज्याचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे व सचिव डॉ. संतोष कदम यांनी जाहीर केला आहे.
आयएमएच्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन मॅस्टॅकॉन २३ या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशना दरम्यान दि. २५ नोव्हेंबर रोजी रुबी हॉल अमरावती येथे करण्यात आले आहे. डॉ. यतीन जाधव व त्यांच्या नेतृत्वाखालील आयएमए टीमच्या काळात राज्यस्तरीय अनेक उल्लेखनीय कार्यक्रम व कामगिरी आयएमए चिपळूणच्या सदस्यांनी पार पाडली आहे. अशाच समाजाभिमुख, बहुआयामी कारकीर्दीबद्दल डॉ. यतीन जाधव व त्यांच्या नेतृत्वाखालील आयएमए टीमने अनेक राज्यस्तरीय, उल्लेखनीय व मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. पिंक हेल्थ मिशन, औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सा राज्यस्तरीय परिषद, दिवाळी पहाट, आयएमए मॅगझीन, घरगुती गणेशोत्सव स्पर्धा, नवरात्री महोत्सव, ईद ए मिलादच्या दिवशी जपलेला सद्भावना दिन, महिला दिनानिमित्त आरोग्य अभियान, तृणधान्य पोषक पाक कला स्पर्धा, विविध गुण दर्शन सांस्कृतिक महोत्सव, सामाजिक संस्थांना पालकत्वाच्या भूमिकेतून मदत, निःक्षय मित्र योजनेद्वारे क्षय रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत, आओ गाव चले योजनेद्वारे गावातील दुर्बल घटकांना मदत, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्य वाटप, ऍनेस्थेशीया डे सेलिब्रेशन, अध्यक्ष राज्यस्तरीय निवडणूक, डॉक्टरांच्या विविध समस्या व त्यांचे निवारण होण्यासाठी मार्गदर्शन, असंख्य आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी कर्करोग निदान शिबीर, अवयव दान शिबिरे, साक्षरता दिन, विविध इनडोअर व आऊटडोअर खेळांच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे डॉक्टर मंडळींच्या प्रतिभा आविष्कृत करणारे नानाविध उपक्रम आयएमएने या काळात हाती घेतले. डॉक्टरांशी व सामान्य नागरिकांशी निगडित असलेल्या सर्वांगीण, सर्वसमावेशक कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल आयएमए महाराष्ट्र राज्यातर्फे हा पुरस्कार आयएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, डॉ. अब्बास जबले व डॉ. कांचन मदार यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आय एम ए महाराष्ट्र राज्याकडून प्रदान केलेला हा गौरव डॉ. यतीन जाधव यांनी आपल्या आयएमए चिपळूणच्या चमूला समर्पित केला आहे. दिवंगत डॉ. संजीव शारंगपाणी, डॉ. दिलीप पाटील, डॉ. सतीश देसाई, डॉ. यशवंत देशमुख, डॉ. शामकांत गजमल, डॉ. विजय रिळकर, डॉ. विकास नातू या सर्वांचे मार्गदर्शनवजा प्रोत्साहन आणि डॉ. अब्बास जबले, डॉ. अमोल निकम, डॉ. विकास जोगळेकर, डॉ. सुनील निकम, डॉ. अरविंद पोतदार, डॉ. अजय सानप, डॉ. राजन साखरपेकर, डॉ. सुनील निकम, डॉ. कांचन व डॉ. शिरीष मदार, डॉ. ज्योती यादव, डॉ. गोपीचंद व डॉ मनीषा वाघमारे, डॉ. रूपा व यतीन मयेकर, डॉ. अनुपमा व डॉ. गणेश जोशी, डॉ. संजय कलकूटगी या सर्वांच्या आयएमए चिपळूणच्या विविध कार्यक्रमातील अत्यंत कृतिशील व उत्साही सहभागामुळेच या सन्मानाचा लाभ होऊ शकला व आयएमए चिपळूणचा लौकिक राज्यपातळीवर वाढू शकला, असे मनोगत डॉ. यतीन जाधव यांनी व्यक्त केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!