ग्रामपंचायत पिरंदवणे व शाळा व्यवस्थापन समिती पिरंदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धा काल शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी जि. प. पू. प्रा. मराठी शाळा पिरंदवणे क्र. १ येथे पार पडली. यामध्ये केंद्रातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांनी, उत्कृष्ट रंगसंगतीने परीक्षक, शिक्षक आणि ग्रामस्थ तसेच बक्षीस वितरणासाठी विशेष निमंत्रीत पाहुणे अतिशय प्रभावित झाले. पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख महेंद्र जाधव सर यांनी केले. यानंतर चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं. सदस्य प्रकाश गमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प. रत्नागिरीच्या माध्यमातून नासा (अमेरिका) व इस्रो (बेंगळूरू) येथे जाण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून पिरंदवणे शाळेचे विद्यार्थीही चमकदार कामगिरी करतील असा आस्वाद व्यक्त केला. अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी विपरीत परिस्थितीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन यश संपादन करत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे” असे त्यांनी सांगितले.
बीटचे विस्तार अधिकारी त्रिभुवने साहेब यांनीही स्पर्धा आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी विषद करताना पिरंदवणे शाळेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच नासा येथे जाण्यासाठी केंद्रातून निवड झालेले शिक्षक थरवळ सर यांचे अभिनंदन करताना केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात सरपंच विश्वास घेवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षकांनाही जास्तीतजास्त सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले. शाळेतील पदवीधर शिक्षक संतोष चव्हाण सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाचा समारोप केला. सरपंच विश्वास घेवडे, उपसरपंच सौ. अंजली मेस्त्री, डिंगणी सरपंच समीरा खान, पिरंदवणे ग्रा.पं. सदस्य प्रकाश गमरे, अंजली झगडे, पल्लवी घेवडे, ग्रामसेविका माया गुरखे, कोळंबे बीटचे विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, डिंगणी केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, पिरंदवणे शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत सर, घेवडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक खापरे सर, निवईवाडी शाळेचे मुख्याध्यापक गड्डुमवार, खाडेवाडीचे मुख्याध्यापक मनवे सर, बागवाडी शाळेचे संजय तटकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश आंग्रे, डिंगणी गुरववाडीचे थरवळ सर, मनवे मॅडम, बागवानी कोंड शाळेच्या चव्हाण मॅडम तसेच स्पर्धेचे परीक्षण करणारे मान्यवर परीक्षक, डिंगणी गावचे वामन काष्टे, विशाल कदम, पिरंदवणेमधील प्रतिष्ठित नागरिक जयराम घेवडे, प्रभाकर घेवडे, दिलीप गुरव, माजी सरपंच माधवी गुरव, शरद मेस्त्री, शाखा प्रमुख दत्ताराम मेस्त्री, गोविंद धोपट, दत्ताराम धोपट, सुजय किंजळकर तसेच अन्य ग्रामस्थ आणि सुभेदार प्रदीप चाळके ट्रस्टचे पदाधिकारी व डिंगणी केंद्रातील १० शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.