“स्वतःच्या इच्छेपेक्षा पक्षादेश शिरसावंद्य मानून अविरत कार्यरत कार्यकर्ता-नेता म्हणजे प्रमोद जठार.” – मा. जिल्हा उपाध्यक्ष रत्नागिरी (द.) श्री. हरीभाई पटेल.
‘पुंडलिक वर दे, हारी विठ्ठल’ गजर करत आपला विषय लोकांच्या गळी उतरवणारे, कार्यकर्त्यांना सदैव प्रोत्साहित करणारे आणि प्रसंगी कान पिळणारे, देव-देश-धर्म यांसोबतच कोकणची आर्थिक उन्नती कशी करता येईल हा विचार अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या परीने प्रत्यक्षात उतरवण्याची धडपड करणारे कोकणातील एक धुरंधर नेते म्हणजे मा. आमदार प्रमोद जठार. “भारतीय जनता पक्ष हा कोण्या ‘क्ष’ व्यक्तीच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी नव्हे; तर सर्वसमावेशक ‘अंत्योदय’ साकार करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी एखादा निर्णय घेतात त्याचा सन्मान नाराजी व्यक्त न करता राखणे हे कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे; मुळात तो माझा स्वभावधर्म आहे.” असं म्हणणारे प्रमोद जठार आजच पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या म्हणजेच विद्यमान केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या प्रचाराला लागले सुद्धा.
रोजगाराबाबत सदोदित आग्रही भूमिका मांडणारे, प्रसंगी आक्रमक तर कधी संयम पाळून ग्रामस्थांना कोकणात येणाऱ्या रोजगाराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कोणतीही तडजोड न करणारे प्रमोद जठार, अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकणात आणू इच्छितात. स्थानिक समस्या तातडीने सोडवण्यावर त्यांचा भर असतो. मुख्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीतील पोलीस दलाच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असताना काजू पिकाच्या हमीभावासंदर्भात माहिती दिली होती. याबाबतचा पाठपुरावा करणारे होते मा. आमदार प्रमोद जठार. यासाठी त्यांना आम. नितेश राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचेही सहकार्य लाभले. मात्र सातत्याने याबाबत चर्चा घडवून आणून कोकणातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या प्रमोद जठार यांच्याविषयी शेतकरी वर्गामध्ये कमालीचा आदर वाढला आहे. राममंदिर सोहळा संपन्न झाल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील असंख्य रामभक्तांना रामरायाच्या बालकरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारे आपणच होतात. याबद्दल अनेक यात्रेकरुंनीही आपले शुभचिंतन केले आहे.
अनेक कार्यकर्त्यांशी आत्मीय कौटुंबिक संबंध निर्माण करणारे प्रमोद जठार अनेकवेळा सुख-दुःखात सहभागी होतात. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना ते हातचे राखून ठेवत नाहीत हे खरे असले तरी त्याचा सन्मान कमी होणार नाही याची काळजी घेत खरडपट्टी काढण्याची कला त्यांनी साधली आहे. मा. आमदार म्हणून आजही त्यांचा प्रवास विकास, पर्यटन, रोजगार, शेतकरी कल्याण, युवा सक्षमीकरण असा चालू असून कार्यकर्ता म्हणून पक्ष, पक्षाची विचारधारा, पक्षाचे दायित्व, समर्पण आणि पक्षाचे निर्णय यांचे तंतोतंत निर्वहन करण्याच्या दिशेने सुरु आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणारे प्रमोद जठार जेव्हा म्हणतात ‘पक्ष देईल तो उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार’ त्यावेळी पक्षातीलच नव्हे तर विरोधकही थक्क होऊन म्हणतात ‘हाच खरा निष्ठावंत’. भारतीय जनता पार्टीमध्ये अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची यादीच तयार होईल. याचे कारण भाजपाची विचारधारा सांगते, “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” माझ्यामते असा निष्ठावंत कार्यकर्ता-नेता संपूर्ण कोकणात कधीही पाहण्यात आला नसेल.
विरोधी पक्षांचे नाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विचारधारेला तिलांजली देण्याच्या तयारीत असताना कोकणात मात्र प्रमोद जठारांच्या रुपात निष्ठेला एक नवा चेहरा मिळाला आहे. शेवटी एकच म्हणेन, जठार साहेब “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.” आज आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना आपणास नजीकच्या भविष्यात दुर्दम्य यश, चैतन्य, समाधान लाभो अशी आई अंबाबाईचरणी प्रार्थना करतो.