व्हॉट्सॲप गृप वर केलेल्या आवाहनाला समाजबांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…..
राजापूर – (प्रमोद तरळ)
सोशल मिडियाची ताकद ओळखून जर एखाद्या व्यक्तीने , संघटनेने अथवा समाजाने काम केले तर मोठ मोठी आवाहने सहज पेलता येतात याचे एक चांगले उदाहरण मराठा समाज सेवा संघ , राजापूर यानी घालुन दिले आहे .
मौजे केळवली कोंडोशी येथील एका गरिब कुटुंबाचे वादळी वाऱ्यात पुर्णत कोसळलेले घर मराठा समाजातील दानशूर व्यक्तीनी मराठा समाज सेवा संघाच्या झेंड्याखाली एकत्र येत पूर्ण नव्याने बांधुन दिले असुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे .
घरी अठरा विश्व दारिद्र्य, हाताला काम झेपत नाही , मुलाला नोकरी नाही अशा अवस्थेत केळवली कोंडोशी येथीले तुकाराम चव्हाण हे कुटुंब एका जिर्ण घरामध्ये वास्तव्य करत होते . फेब्रूवारी महिण्यात एक दिवस अचानक आलेल्या वावटळीने या घराचे पुर्ण छप्पर कोसळुन पडले होते . त्यामुळे हे कुटुंब बेघर झाले होते .
त्यानंतर केळवली चव्हाणवाडी येथील मराठा समाज सेवा संघाचे सदस्य मंगेश चव्हाण यानी ही घटना मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली . त्यानुसार मराठा समाज सेवा संघाच्या पदाधिकारी यानी शासकीय मदत मिळू शकेल का ? याची चाचपणी केली मात्र लोकसभा निवडणुकीची जाहीर झालेली आचारसंहिता व शासनाच्या विविध योजना यातून मदत मिळणे कठीण असल्याचे निदर्शनास येताच मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार , सचिव विनोद पवार , खजिनदार प्रशांत पवार , जगदीश पवार , विनायक सावंत यानी विचारविनिमय करुन समाजातील दानशुर व्यक्तीना मराठा समाज सेवा संघाच्या व्हॉट्सॲप गृप वर मदतीचे आवाहन केले .
या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजातील अनेक बाधवानी सढळ हस्ते आर्थिक मदत केली आणि त्यातुन बघता बघता सुमारे पन्नास हजार रुपये जमले . त्यानंतर केळवली येथील नंद्कुमार रामचंद्र पवार यानी या घरासाठी लागणारे सर्व पत्रे , मराठा समाजातील सर्व ठेकेदार यानी लागणारे चिरे वाळु असे साहित्य दिल्याने सुमारे दिड लाखाहुन अधिक खर्चाचे हे घर समाजाने उभे करुन दिले आहे .
या घराचे बांधकाम करताना केळवली चव्हाण वाडी येथील बांधवानी श्रमदानाने या घराचे पुर्ण बांधकाम करुन दिले आहे त्यासाठी केळवली चव्हाण वाडी येथील एकनाथ चव्हाण , नितीन चव्हाण व मंगेश चव्हाण यानी मेहनत घेतली .
पावसाळा सुरु होण्याअगोदर समाजाने तुकाराम चव्हाण याना मराठा समाजाच्या वतीने घर उभे करुन दिल्याने त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे . सोशल मिडियाचा योग्य वापर करत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यानी हे शिवधनुष्य लिलया पेलले असुन समाजात एक आदर्श घालून दिला आहे .