स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.ते १०६ वर्षांचे होते. नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. त्यांनी आपल्या आयुष्यात ३३ वेळा मतदानाचा हक्क बजावला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी नुकतेच शेवटचे पोस्टल मतदान केले. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला. श्याम सरण नेगी यांचा जन्म १ जुलै १९१७ रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आताच्या कल्पा या गावात झाला. त्यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले. परंतु वृद्धापकाळामुळे त्यांना दहावीला प्रवेश मिळाला नाही. नेगी कल्पा येथील शाळेत शिक्षक होते. सुरुवातीला १९४० ते १९४६ या काळात वनविभागात वनरक्षक म्हणून काम केले.
*१९५१ मध्ये पहिल्यांदा केले होते मतदान*
देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ साली पार पडली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हा नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी सांगायचे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे, त्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबरला शेवटचे पोस्टल मतदान केले आहे. ‘शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचं आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते,’ अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.