बातम्या

वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ पुरस्कारातून सदैव प्रेरणा मिळेल : रविंद्र चव्हाण. कोकणातील १० आदर्श संस्थाचालक व ११५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान.

चिपळूण : (ओंकार रेळेकर) समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे. त्यादृष्टीकोनातून नवी पिढी घडविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच विविध भागात काम करताना एखादा विषय सखोल आत्मसात करून स्वत:ची ओळख निर्माण करावी. कै. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ मिळणारा हा पुरस्कार गुणवंत शिक्षकांना सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे व भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील ११५ आदर्श शिक्षक आणि १० संस्थाचालकांचा वसंत स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.ठाण्यातील एम. एच. हायस्कूलच्या सभागृहात आज झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील माजी गटनेते संजय वाघुले,मनोहर डुंबरे, नारायण पवार,माजी नगरसेवक भरत चव्हाण,कृष्णा पाटील,जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सिताराम राणे,परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील,भाजपाचे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे, विरसिंग पारछा, एम. एच. हायस्कूलचे माजी प्राचार्य राजेंद्र रजपूत,भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील,विनोद भानुशाली, शैक्षणिक प्रकोष्टचे जिल्हा संयोजक सचिन बी. मोरे आदींची उपस्थिती होती.

या वेळी कुडुस शिक्षण सेवा संघाचे अध्यक्ष मधुकरराव पदू पाटील, पनवेलच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भगत, कल्याण सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश जयराम पाटील, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जोशी व उपाध्यक्ष नारायण फडके, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आल्हाद जोशी, मिरा-भाईंदर येथील राहुल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष लल्लन तिवारी, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दीपक परशुराम कुलकर्णी, पालघर तालुका शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष वागेश सदानंद कदम, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक प्रमोद रावराणे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे आदी संस्थाचालकांचा सत्कार करण्यात आला. रविंद्र चव्हाण म्हणाले, कोरोना आपत्तीनंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शिक्षणाच्या बदलत्या पद्धतीमुळे विद्यार्थी अस्वस्थ, तर आर्थिक परिस्थितीमुळे पालक अस्वस्थ होते. या परिस्थितीतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.यापुढील काळात भारताच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करावा.”
ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्याच्या राजकारणात दिवंगत वसंतराव डावखरे यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम राहील. त्यांनी कायम हसतखेळत इतरांना आनंद देण्याबरोबरच मैत्रीचे नाते कायम जपले.आदरणीय डावखरेसाहेबांच्या पहिल्या भेटीपासून निर्माण झालेला जिव्हाळा हजारो नागरिकांच्या मनात आहे, अशा शब्दांत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत डावखरे साहेबांच्या आठवणी विषद केल्या. या कार्यक्रमाचे संयोजन एन. एम. भामरे, किशोर पाटील, दिनेश भामरे, विनोद शेलकर, ज्ञानेश्वर घुगे यांनी केले होते. किशोर शेलवले यांनी सुत्रसंचालन केले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही
पुढील वर्षी पुरस्कार : निरंजन डावखरे

विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषवितानाच अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ पुरस्काराच्या माध्यमातून कोकणाच्या विविध भागातील शिक्षकांचा गौरव केला जात आहे. संस्थाचालक व शिक्षकांप्रमाणेच अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्तम कार्य केले आहे. पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा आमदार व समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. फोटो – विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील आदर्श संस्थाचालक व शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गुणवंत शिक्षक.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!