संगमेश्वर : राज्य महामार्ग-१७४ आणि राष्ट्रीय महामार्ग-१६६ यांना जोडणाऱ्या बाव नदीवरील पुलाला मान्यता दिल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती मा. रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दि. २६ एप्रिल २०२१ रोजी ट्वीटद्वारे प्रसृत केली. हा ब्रीज मारळ-निवधे-जाधववाडी-साखरपा या गावांमधून जातो. हे ट्वीट करताना मा. मंत्री महोदयांनी “प्रगती का हायवे” असा शब्दप्रयोग केला होता. देवधेसारख्या कोकणातील एका लहानशा खेडेगावातील लोकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने दूर करण्यासाठी ४.३२ कोटी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करणार्या मोदी शासनाची आणि मंत्री गडकरींच्या कामाची स्थानिक जनता तोंड भरून स्तुती करत आहे. गेल्या साडेआठ वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने मा. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकोत्तर कामे केली आहेत. यामुळेच नितीन गडकरी यांची ओळख विकासपुरुष अशी बनली आहे. त्यांनी मंजूरी दिलेल्या या पुलाचे भूमिपूजन जवळपास दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उद्या होत आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. तशा प्रकारची पोस्टरबाजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. ज्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून या प्रकल्पाची मंजूरी मिळाली त्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्त्वाला, पदाधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात निमंत्रण न देऊन आपल्या मनाचा कोतेपणा दाखवला आहे; ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.
मागील साडेआठ वर्षे शेतकरी सन्मान निधी, जन-धन योजना, उज्ज्वला गॅस योजना, मोफत रेशन धान्य वाटप या आणि इतर अनेक योजनांच्या माध्यमातून घराघरात पोचलेल्या मोदी सरकारनेच या पुलाच्या बांधकामासाठी मंजूरी व भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे याची प्रत्येक स्थानिक नागरिकाला कल्पना आहे. त्यामुळे केवळ भाजपाला श्रेय मिळू नये व आपल्याच माध्यमातून विकासकामे होत आहेत असा डंका पिटण्यासाठी अशाप्रकारे भाजपा कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांना डावलण्याचा घाट घातला जात आहे.
स्थानिक आमदार व खासदार हे विरोधी पक्षाचे असल्याने हेतुपुरस्सर प्रत्येक कामात श्रेयवादाचा प्रश्न उपस्थित रहातो. मागील अनेक कामांचे श्रेय हे अशाच पद्धतीने लाटण्यात विरोधी नेत्यांना यश आले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, श्री देव मार्लेश्वर व श्री गिरिजादेवी यांच्या विवाहानिमित्त देवीची पालखी पूर्वी आत्ताआत्तापर्यंत काट्याकुट्यांतून जात होती. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीमध्ये आले असताना साखरप्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना या रस्त्याबाबत निवेदन दिले. यानंतर २०१९ मध्ये प्रचारासाठी आलेल्या विनायक राऊत यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्पर सहकार्यामुळेच सदर रस्त्याचे काम मार्गी लागत असल्याचे वक्तव्य केले. मात्र उद्घाटन गुपचूप भाजपा कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीत केले होते. एवढे श्रेय घेण्याचे हपापलेपण आम्ही पाहिले आहे.
मात्र आता समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) जनता जागी झाली आहे. कोणते काम कोणी केले व कोणाच्या प्रयत्नांमुळे होत आहे याची माहिती लोकांना योग्य वेळेत मिळत आहे. त्यामुळे कामाचा पोकळ दिखावेपणा करण्यासाठी भूमिपूजन सोहळा करून ‘आमच्यामुळेच हे काम होत आहे; आम्हीच तुमचे तारणहार आहोत.’ असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. यापेक्षा थेट कामाला सुरुवात करावी. यापुढे जनता पूर्वीसारखे असे प्रकार खपवून घेणार नाही याबाबत वेळीच संबंधितांनी सावध व्हावे असा इशारा भाजपाच्या माध्यामातून देण्यात आला आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*