नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी इतर मागावर्गीय अर्थात ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, या विषयावरची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासोबतच थेट नगराध्यक्ष निवडीच्या पध्दतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? ओबीसी आरक्षण असणार की नाही? याबाबत सर्वांच्या मनातच उत्सुकता आहे. आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ९२ नगरपरिषदांना लागू होत नव्हता. पण राज्य सरकारने या निकालावर पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली आहे. या प्रकरणावर सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील याआधीची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर केवळ तारखा पडत आहेत. सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल, असे न्यायालयाने या आधी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत हा निकाल लागणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र*