राम भोस्तेकर (माणगाव)
माणगाव : उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कंत्राटी कामगारांवर गेली अनेक वर्षे अन्याय होत असून त्यांना अल्पशा वेतनामध्ये राबवून घेतले जाते. त्यांना कामाचा योग्य तो मोबदला देखील दिला जात नाही. यावर त्यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. असाच प्रकार उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथील स्वयंपाक गृहातील बबिता गायकवाड व सुषमा महाडीक यांच्या बाबतीत घडलेला आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी माणगांव उमेश बिरारी व नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्याकडे आपला तक्रारी अर्ज देऊन दाद मागितली आहे.
माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून दररोज आजूबाजूच्या तालुक्यातून व खेडेगावातून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्याला उपजिल्हा रुग्णालय माणगांव तर्फे सेवा दिली जाते. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालय माणगांव हे हजारो रुग्णांसाठी वरदानच ठरले होते. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना, गरोदर मातांना आहार सेवा पुरविली जाते. या आहार सेवेचा ठेका पालघर येथील एका कंत्राटदाराला मिळाला असून प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी दुसराच कोणीतरी तालुक्याबाहेरील व्यक्ती हे कंत्राट पाहत असल्याचे दिसते. तसेच या ठिकाणी आहार सेवा देण्यासाठी स्वयंपाकगृहात चार सेविका व एक सुपरवायझर काम करीत होते. मात्र आता दोनच सेविका काम करीत असून कंत्राटदार साजूक तुपाशी तर कामगार उपाशीच असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यातच बबिता गायकवाड व सुषमा महाडिक या २००४ पासून उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आहार सेवेमध्ये रुग्णांना आहार सेवा देण्याचे काम करीत होत्या. कोरोना काळात देखील त्यांनी प्रामाणिकपणे आहार सेवा देत आपले काम चोख बजावली. मात्र जुलै २०२० मध्ये बबिता गायकवाड व सुषमा महाडिक यांना संबंधित सब ठेकेदार यांनी सांगितले की, तुम्ही काही दिवस सुट्टी घ्या. काही दिवसांनंतर तुम्हाला पुन्हा कामावर घेण्यात येईल. काही दिवसांनंतर त्या संबंधित सब ठेकेदारास कामासाठी विचारण्यास गेल्या असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फोन केले असता अपमानास्पद वागणूक देत आता त्यांचे फोन सुद्धा सब ठेकेदार उचलत नाही. उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे २००४ पासून सफाई, आहार, धुलाई व सुरक्षा रक्षक या सेवा कंत्राटदारांमार्फत देण्यात येत आहेत. त्यानंतर २०१८ साली नवीन ठेकेदाराला ठेका मिळाल्यानंतर काही कामगारांना विनाकारण काढण्यात आले. तसेच तालुक्याबाहेरील कामगार आणून संबंधित ठेकेदारांने स्थानिक कामगारांवर अन्याय व त्यांची हेळसांड केली. याबाबतीत शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे व माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार व डॉ. संतोष कामेरकर यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून स्थानिकांवर केलेल्या अन्यायाबाबत खडसावले असता संबंधित सब ठेकेदार यांनी सांगितले की, काही दिवसांत या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेईन असे आश्वासन दिले. परंतु, आजतागायत त्या कामगारांना कामावर परत घेतलेच नाही. बबिता गायकवाड व सुषमा महाडिक यांनी बोलताना सांगितले की, आमचं अर्ध आयुष्य अल्पशा वेतनात काम करीत उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे गेले. आम्हाला अचानक कामावरून काढल्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे आमच्यावर झालेल्या अन्याय दूर करून आम्हाला न्याय मिळावा व परत कामावर रुजू करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या संदर्भात उपजिल्हा रुग्णालय माणगांवचे वैद्यकीय अधिक्षक गोमसाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी आताच बदली होऊन येथे रुजू झालो असून मला याबाबतीत काही माहीत नाही. तसेच पालघर येथील मुख्य कंत्राटदार चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता मी चौकशी करतो. याबाबत मला काहीही माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. फोटो-माणगांव न. पं. नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांना झालेल्या अन्यायाबाबत निवेदन देताना बबिता गायकवाड दिसत आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.