रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराची चोरी होऊ लागली असून काही ठिकाणी मौल्यवान साहित्यही चोरी करुन नेले जात आहे . यामुळे शहरात बसवलेले सीसी टीव्ही केवळ शोभेचे आहेत का असा सवालही उपस्थित केला जात आहे .
रत्नागिरी शहरात पोलिसांनी तसेच नगर परिषदेने बसविलेले सीसीटीव्ही कोणते चालू कोणते बंद याची माहितीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे बसवण्यात आलेले सीसीटीव्ही हे फक्त शोभेसाठी आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या होणाऱ्या चोऱ्या आणि त्यातूनच वाढलेल्या भंगार व्यावसायिकांच्या चोऱ्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे . अनेक ठिकाणी भंगारात वाहने देऊन त्याची मोडतोड केली जाते . काही ठिकाणी गाड्यांचे सुटे भाग करुन वाहने भंगारात टाकली जातात यावरही लक्ष देणे गरजेचे ठरत आहे . रत्नागिरी शहरातील डिव्हायडर वरील लोखंडी पोल देखील चोरी केल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आल्या होत्या. अपघातामुळे नगरपरिषदेच्या डीव्हायडरचे नुकसान झालेल्या ची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न झाल्याने यावरती अधिक तपास होऊ शकला नसल्याचे कळते. रत्नागिरी शहरासह ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जमा करणाऱ्यांची संख्या पहाटेच्यावेळी मोठी आहे या सर्वावरती नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यांची संख्या वाढवावी व हे फक्त शोभेची वस्तू असू नये तर ते कार्यान्वित असावे अशी मागणी रत्नागिरी शहरवासीयांमधून होत आहे.