रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि त्यापुढे भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विचारसरणीचा प्रभाव या गोष्टी मी एकनिष्ठ असण्यासाठी कारणीभूत आहेत. माझ्या शिक्षण संस्थेसाठी पुरेसा वेळ देऊन स्थिरस्थावर करत होतो आणि यश फाऊंडेशनच्या माध्यमातून सामजिक कार्य सुरूच होते ही वस्तुस्थिती आहे. परंतू लोकांचे आजही बाळ मानेवर तेवढेच प्रेम आहे जेवढे पूर्वी होते ही गोष्ट fact check केल्यास माध्यमांच्या लक्षात येईल.
राजकीय जीवनात अनेक चढउतार पहावे लागतात; अनुभवावे लागतात. बाळ माने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत होता; गुणवत्ता, सचोटी आणि निष्ठा हे गुण हेरून पक्षश्रेष्ठींनी नेता होण्याची संधी दिली. सोन्याचा चमचा घेऊन न आलेल्या बाळ मानेचे नेतृत्व लोकांनी मान्य केले. तेच लोक आहेत; जे पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी मला मदत करणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात बाळ माने छोट्यामोठ्या समारंभात, कार्यक्रमांत किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास माध्यमांनी नवल वाटून घेऊ नये. राजकारण करताना ‘स्वार्थ’ या विषयाचे विविध कंगोरे बघायला मिळतील. यामध्ये वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी सदैव स्वार्थी राहीन. रत्नागिरीतील अनेक महनीय व्यक्तींनी स्वकष्टाने परिश्रमपूर्वक रुजवलेल्या भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा शिखरावर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि खात्रीने सांगतो, यावेळी माझे लोक मला नक्कीच सहकार्य करतील.
विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्न करणे नक्कीच घटनात्मक अधिकार आहे. लोकसभा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे स्वप्नं असायला खरेच हरकत नाही. प्रत्यक्ष मोदी साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास त्यास कोण नकार देईल? परंतू मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे स्वप्नरंजन मला मान्य नाही. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा, त्यांना लाभ मिळवून देऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा ‘अंत्योदय’चा एककलमी कार्यक्रम सध्या राबवत आहे. स्थानिक राजकारणावर आत्ताच टिप्पणी करून भविष्यातील घडामोडींचा अंदाज लावत बसण्यापेक्षा मी नम्रपणे लोकांमध्ये सहकुटुंब मिसळून जात आहे. त्यामुळे याविषयावर आत्ताच फार तर्कवितर्क करावेत का हा माध्यमांचा प्रश्न आहे.दखल न्यूज महाराष्ट्र.
