शतक एकविसाव…आंतरजातीय प्रेम विवाहातून एका नवयुगालाचा भर रस्त्यात, भर दिवसा खून केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आली तरीसुद्धा आपले जाणकार नागरिक तर सोडाच, पण आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील भगवा की हिरवा यांसारख्या विषयांवरचे वाद हे हिंसक वळण घेतात. मित्रहो आज निर्भयासारख्या मुलींवर कृरतेची सीमा पार केली जाते आणि त्याही पुढे जाऊन एका हत्तीनीला फटाक्याने भरलेली फळे घालून तिचा जीव घेण्याची कृरता करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने चौकटीत अडकवलेल्या, धर्मनामक मानवी विचारसरणीची खरंच चिड येऊ लागते.
म्हणून नेमका आजचा हा विषय घेऊन हा लेख लिहीत आहे.

हीच आमुची प्रार्थना.
अन हेच आमचे मागणे .
माणसाने माणसाशी ,
माणसासम वागणे.
म्हणजे धर्म.
धर्माची व्याख्या करताना सर्वप्रथम साने गुरुजींच्या शब्दात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा करेन.
आणि का ते आपण सर्वांना ज्ञात असेलच. पण तरीही आज धर्माच्या संकल्पनेला एका चौकटीत ठेवून ती चौकट म्हणजे सर्वस्व आहे, यावर जगत असणाऱ्या आजच्या समूहाला धर्म म्हणजे काय हे समजावून देण्याची कुठेतरी गरज भासते. कारण आज, देहाकडून देवाकडे, मुक्तीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे धर्म, धर्मरक्षण, धर्मवाढ याचे वारे वाहताना दिसून येतात. पण मुळात देहाकडून देवाकडे किंवा मुक्तीकडे जाण्याच्या मार्गामध्ये कुठलाही धर्म येत नाही. येतो तो देशदेश, देशपालन ,देश संरक्षण आणि देशवाड. आणि हा मार्ग समजलेले एक उत्तम उदाहरण म्हणजे सीमेवरचे सैनिक. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा ,प्रेम, कर्तव्य, आपल्या संपूर्ण भारतीयांच्या किंवा प्रत्येक जाती धर्मासाठी रक्षणासाठी असलेले त्यांचे कर्तव्य आणि परिणामी त्यांची जीवाची आहुती देण्या साठी असलेली त्यांची तत्परता, हा खरा धर्म. आणि आपल्या संकल्पनेतील धर्माच्या पलीकडचा एक खरा धर्म. आज अनेक धर्म हे त्यांच्या धर्मग्रंथांवरती चालताना दिसून येतात.
पण आपण धर्मग्रंथ वाचतो. त्यातील शब्द वाचतो . मात्र त्याचा अर्थ आणि गाभा समजून घ्यायला विसरतो आणि म्हणूनच कट्टरता आणि धर्मवाद दिसून येतो असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही.
ज्यावेळेस भगवद्गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य’ हा श्लोक वाचतो तेव्हा त्यातील धर्म हा आपल्याला सत्यता मानवता आणि योग्य मार्ग शिकवतो.
यावेळेस भगवान कृष्ण असे म्हणतात की ज्या वेळेस इथे अधर्माच राज्य माजेल तेव्हा मी पुन्हा जन्म घेईन. त्यावेळेस ते कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या रक्षणासाठी किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संरक्षणासाठीच जन्म घेईन असं कुठेही ते म्हणत नाहीत. किंबहुना ते या पृथ्वीतलावर माजलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माणसांना योग्य मार्ग शिकवण्यासाठी जन्म घेतील असं ते म्हणतात. मग भगवंतांच्या या धर्माच्या संकल्पनेला एका विशिष्ट नामक धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा अधिकार आपल्या सर्वांना दिला कोणी याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यावरून एकच निष्कर्ष निघतो की कोणताही धर्माच्या भगवंतांनी दिलेली शिकवण ही कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नव्हे तर ती सर्वांसाठी आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या धर्माच्या विचारांच्या पलीकडची आहे.
काही धर्मांमध्ये आज अनेक बंधन आणि नियम दिसून येतात. स्त्रियांवरती असंख्य बंधन दिसून येतात. पण मुळात चारित्र्य लपवण्यापेक्षा अभिमानाने चारित्र्य मिरवणारा आणि आपल्या कर्तव्यांनी दुसऱ्याच्या चारित्र्याची जपणूक करणारा खऱ्या अर्थाने धर्म असतो. कारण चारित्र्य लपवलं तरी चारित्र्य लुटणारे राक्षस या समाजात आज कमी नाहीत. मात्र त्या लुटणाऱ्यांना थांबवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एखाद्या त्याला किंवा तिला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येणाऱ्या समूहाच्या सकारात्मक कर्माला आपण खरा धर्म नक्कीच म्हणू शकतो.
मित्रहो नामक धर्माच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन आज धर्म म्हणजे अहम, धर्म म्हणजे आम्ही ,आमचं, आमच्यासाठी ही संकल्पना दिसून येते. त्याही पुढे जाऊन अंध भक्तांची आपल्या पक्षाला धर्म मानून केली जाणारी सेवा, ही तर अपरंपारच. यावरून एक लक्षात येतं की आपल्या धर्माच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन आज समाजाला धर्म म्हणजे काय? तर कर्म, कर्तव्य याचं नक्कीच आकलन झालेलं आहे. मात्र आपण आपला धर्म किंवा आपलं कर्तव्य कुठे आत्मसमर्पण करत आहोत त्यावरून ठरतो खरा धर्म . कारण मुळात खरा धर्म म्हणजे काय तर ,आत्मसमर्पण. पण ते आत्मसमर्पण विशिष्ट जातीसाठी, धर्मासाठी नव्हे तर मानवतेसाठी, मानवाच्या योग्य हक्कांसाठी, कर्तव्यासाठी आणि देशासाठी. आणि हे जेव्हा कळेल ना तेव्हा साध्य होईल खऱ्या अर्थाने धर्माच्या पलीकडचा एक खरा धर्म.
विषयाच्या उत्तरार्धात आवर्जून लिहावसं वाटतं, की श्रीकृष्णांनी शिकवलेला निखळ मैत्री , प्रेम , सत्याचा मार्ग म्हणजे खरा धर्म. गांधीजींचा तो अहिंसा परमो धर्म. लोकमान्य टिळकांची अन्यायाविरुद्ध फोडलेली वाचा म्हणजे खरा धर्म , साने गुरुजींनी आपल्या कवितेतून शिकवलेल प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश म्हणजे खरा धर्म. आणि शिवरायांनी पाहिलेलं स्वराज्याच स्वप्न, त्याप्रति बजावलेली आणि सांगितलेली कर्तव्य म्हणजे खरा धर्म. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासम वागणे एवढेच नव्हे तर, माणसाने प्रत्येक सजीवाशी, प्रत्येक जीवाशी माणसासम वागणे म्हणजे खरा धर्म. आणि हे जेव्हा आपल्या सर्वांच्या लक्षात येईल तेव्हा या चौकटीच्या बाहेर जाऊन एक नवा धर्म उदयास येईल. तेव्हा आपण अभिमानाने म्हणू शकतो, की खरा धर्म धर्माच्या पलीकडचा. दखल न्यूज महाराष्ट्र.
