प्राथमिक गटातून कवठेवाडी शाळेचा सन्मान
खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवत गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळा अत्याधुनिकतेच्या दृष्टीने परिपूर्ण बनविणाऱ्या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करून त्या शाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाते. याप्रमाणे यावर्षी सन २०२२ – २३ चा आदर्श शाळा पुरस्कार रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेला जाहीर झाला आहे.
यासाठी शासनाने निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या सूचना जिल्हा परिषद रत्नागिरीने परिपत्रकांन्वये दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीने आपल्या शाळेचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत छाननी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेने निश्चित केलेले निकष, शाळेने राबविलेल्या उपक्रमाधारे गुणांकन करून प्राप्त केलेल्या उत्कृष्ट गुणांमुळे नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी रत्नागिरी तालुक्यात कनिष्ठ गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर केला.

रत्नागिरी तालुक्यात अत्यंत ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेने आतापर्यंत सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी शाळेला पालक व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान मिळत असते. त्यामुळे शैक्षणिक उपक्रमासोबतच अनेक सामाजिक, आरोग्य, क्रीडा, साहित्यिक, प्रबोधनात्मक, पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात येतात.
त्यामध्ये पर्यावरण संतुलन आणि वृक्षसंवर्धन हा हेतू समोर ठेवून राबविण्यात आलेला झाडांचे बारसे, संगणक शिक्षण, आरोग्याचे पंचक, शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा यासाठी हस्तलिखित तयार करणे, विद्यार्थ्यांच्या द्वारे परसबाग विकसित करणे, विविध शाळाबाह्य स्पर्धा व स्पर्धा परीक्षा आयोजित करणे, कार्यानुभव अंतर्गत राख्या बनवणे, लोणचे तयार करणे, शासनाने निश्चित केलेले १०० टक्के पटनोंदणी करणे, शाळाबाह्य मुले शोधणे, शंभर दिवस वाचन उपक्रम, पहिलं पाऊल, शाळा प्रवेशोत्सव, हर घर तिरंगा अभियान, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यासह शासकीय विविध अभियान, शिकू आनंदे, स्वाध्याय, दिक्षा अँपच्या माध्यमातून शिक्षण, गोष्टींचा शनिवार, प्लास्टिकची होळी, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे, शाळेचा जिर्णोद्धार करणे, विज्ञान प्रदर्शन भरविणे, आरोग्य आणि स्वच्छता अभियान, यासह गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असे अनेक उपक्रम, विविध दिन, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती – पुण्यतिथी साजरी करणे असे ६५ च्यावर उपक्रम यशस्वीपणे विद्यार्थ्यांसाठी पालक, ग्रामस्थ यांच्या सहाय्याने राबविण्यात येतात.
या सर्व उपक्रमाची दखल त्या – त्या वेळी नामदार उदयजी सामंत साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, महाराष्ट्र राज्य महिला व आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अण्णा सामंत, तत्कालीन जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी सभापती, तत्कालीन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, विद्यमान तहसीलदार शशिकांत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या नीलम पालव, तत्कालीन पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि मान्यवर अधिकारी यांनी घेत शाळेच्या वाटचालीचे कौतुक करत प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे शाळेने सातत्याने वरील उपक्रमाचे यशस्वी आयोजन करत अपेक्षित उद्देश साध्य करण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी शाळेला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यादरम्यान राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमामध्ये शालेय व्यवस्थापन समिती, शाळा जिर्णोद्धार समिती, माता – पालक संघ, शिक्षक पालक संघ, पालक, ग्रामस्थ यांचे मोठे योगदान आहे. मागील पाच वर्षात शाळेने वरील सर्वांच्या मदतीने प्रशासन आणि समाजातील दानशूर लोकांकडून तब्बल पंधरा लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला. त्यामुळे शाळेला अत्याधुनिक स्वरूप येण्यास मदत झाली आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याने सर्व पालक, ग्रामस्थ यांना नवा उत्साह मिळाला शाळेच्या भौतिक गरजा दर्जेदार व अत्याधुनिक करण्याचा विचार असून, त्यासाठी शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांना कायम सहकार्य करण्याची भूमिका शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांनी व्यक्त करत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला धन्यवाद दिले. तर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे यांनी व्यक्त केले आहे.
शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याने पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, वाटद केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल पवार यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
शाळेला आदर्श पुरस्कार मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी उपशिक्षक गोविंद डुमनर यांच्या सहाय्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालक – ग्रामस्थांच्या सहकार्याने केले होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
