संगमेश्वर – (प्रमोद तरळ) दि २ जून
शासकीय निधीचा अपव्यय आणि अयोग्य वापर या कारणास्तव संतप्त अंत्रवली येथील रहिवासी पत्रकार संदेश जिमन आणि गावातील ग्रामस्थानी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
अंत्रवली मालपवाडीत जिल्हा परिषदे मार्फत ४ लाख २२ हजार रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला. मात्र यासंदर्भात ग्रामस्थांशी कोणत्याही स्वरूपाची चर्चा न करता अयोग्य जागी पूल बांधण्यात आला. या पुलावर पायर्या चढताना रेलिंगचा आधारही नाही. पुलाजवळ जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. या संदर्भात ग्रामसभेमध्ये वारंवार प्रश्न मांडण्यात आला होता. पण शिताफीने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शासकीय निधीचा अयोग्य वापर केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच स्थानिक निधीतून जेथे काम होते त्या कामाच्या ठिकाणी फलक लावला गेला पाहिजे असा शासकीय अध्यादेश आहे. मात्र ग्रामपंचायतीमार्फत या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासंदर्भातही वारंवार विचारणा करूनही ग्रामस्थांच्या तोंडाला पानेच पुसली. वारंवार पत्रव्यवहार करूनही ग्रामपंचायत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून १० दिवसांच्या आत योग्य तो न्याय मिळाला नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा पत्रकार संदेश जिमन आणि ग्रामस्थांनी अखेरीस दिला आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

