शाळेच्या नर्सरी विभागाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न
चिपळूण (ओंकार रेळेकर) काही वर्षापूर्वी अतिशय अडचणीत किंबहुना बंद पडण्याच्या मार्गावर आलेली शाळा आम्ही ताब्यात घेतली आणि तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला. अशा वेळी पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास , शिक्षकांनी दाखवलेली बांधिलकी यामुळे शाळेचं रूप पालटू शकलो. परंतु, एवढयावरच न थांबता आता शाळेला अधिक नावारूपाला आणण्याचा तसेच भविष्यात 11वी व 12 वीचे वर्गही सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे उद्गार पेरेन्ट्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी काढले.
येथील पेरेन्ट्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. एम. बांदल स्कूलच्या नर्सरी विभागाचे उद्घाटन श्री. जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिपक नोवोकेम टेक्नॉलॉजिस लि.चे व्यवस्थापक श्री. उमाकांत रूगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नर्सरीतील विदयार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या खेळ विभागाचे तर सौ. सुवर्णाताई जाधव यांच्या हस्ते खेळण्यांचे उद्घाटन करण्यात आले.आमची शाळा तांत्रिकदृश्टयासुध्दा अडचणीत होती. आता या अडचणीतूनही शाळा बाहेर पडली आहे, असे सांगताना चेअरमन श्री. जाधव यांनी आमच्या शाळेमध्ये आम्ही इतरांप्रमाणे निवड करून मुलांना प्रवेश देत नाही, तर सरसकट प्रवेश देतो, आम्ही आमच्या शिक्षकांना पुरेसा पगार देवू शकत नाही, तरीदेखील शाळेचा दहावीचा निकाल हा सातत्याने शंभर टक्के लागतो. आम्ही शाळा उभारणीसाठी जे योगदान देत आहोत त्यास शिक्षक वर्गाची मिळणारी साथ, विदयार्थ्यांशी असलेली त्यांची बांधिलकी यामुळेच हे शक्य होत असल्याचे ते म्हणाले.यानिमित्ताने दहावी तसेच एमपीएसपी परीक्षेतील सर्व यशस्वी विदयार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. मिलिंद कापडी, उपाध्यक्ष बी. डी. शिंदे, संस्थेच्या संचालिका सौ. वैभवी विक्रांत जाधव, फैसल कास्कर, अजय घाग, बाळा आंबुर्ले, मुख्याध्यापिका सौ. साक्षी शिंदे , माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वहिदा परकार, साजन कापडी आदी उपस्थित होते.

फोटो : नर्सरी विभागाचे उद्घाटन करताना संस्थेचे चेअरमन आमदार श्री. भास्करराव जाधव, दुसऱ्या छायाचित्रात खेळाच्या साहित्याचे उद्घाटन करताना सौ. सुवर्णाताई जाधव व दिपक नोवोकेम टेक्नॉलॉजिस लि.चे व्यवस्थापक श्री. उमाकांत रूगे, शेजारी श्री. भास्करराव जाधव, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. मिलिंद कापडी, उपाध्यक्ष बी. डी. शिंदे, संस्थेच्या संचालिका सौ. वैभवी विक्रांत जाधव, फैसल कास्कर, अजय घाग, बाळा आंबुर्ले, मुख्याध्यापिका सौ. साक्षी शिंदे , माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वहिदा परकार, साजन कापडी आदी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)