चिपळूण – (प्रमोद तरळ) कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान श्री क्षेत्र टेरव येथील पालखीतील कुलदैवत भवानी, ग्रामदैवत वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या ६ रुपी नवीन घडविण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रामस्थ, चाकरमानी, माहेरवासिनी भाविकांनी सढळ हस्ते १३.२५ लाख रुपये किमतीची १८ किलो चांदी भेट स्वरूपात अर्पण केली.
. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे टेरवचे सुपुत्र आणि सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक सर्वश्री अजित कदम आणि सुधाकर कदम यांनी संदेश, फोनद्वारे, हस्ते परहस्ते संपर्क व समन्वय साधून २७५ पेक्षा जास्त देणगीदारांकडून १८ किलो चांदी भेट स्वरूपात जमा करण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, इ. ठिकाणच्या देणगीदारांकडून १४ किलो चांदी मुंबईत एकत्रित करून श्री क्षेत्र टेरव येथे मंदिर व्यवस्थापन समितीच्या स्वाधीन केली, तर अनेक देणगीदारानी सदर समितीकडे ४ किलो चांदी स्वतः सुपूर्द केली. सरस्वती कोचिंग क्लासेसचे कॉर्पोरेट कार्यालयीन कर्मचारी सौ. रूपाली पालांडे, सौ. सुप्रिया महाडिक, सौ शारदा विचारे तसेच मुख्य कार्यालयीन कर्मचारी श्री अभिजित पालांडे, सौ. रंजना कदम, सौ. सायली माने, सौ. मनीषा पोकळे, सर्वश्री अविनाश पवार, सदानंद साळवी या सर्वांनी या कामी योग्य समन्वय साधून सर्व देणगीदारांच्या यादया, अचूक नोंदी तसेच आलेल्या रोख रखमा, जी. पे. रक्कम इ. हिशेब ठेवून १००% पारदर्शकता राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. सुवर्णकार श्री विजय तायशेटे चारकोप, श्री दत्ता कदम लिंगेश्वरवाडी, श्री दिनेश कदम व महिला मंडळ तळेवाडी तर्फे श्रीमती शोभा विजयराव कदम व सौ. शालिनी चंद्रकांतराव कदम, तसेच श्री दत्ता साळवी कुंभारवाडी व इतर अनेक चाकरमानी यांचेही या बाबतीत मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या पालखीतील नवीन रुपींची प्राणप्रतिष्ठा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी, गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी (ज्येष्ठ गौरी मातेच्या आगमना दिनी) करण्यात येणार असून अश्विन शुद्ध प्रतिपदेला, रविवार दिनांक १५ ऑक्टोबर, २०२३ रोजी घटस्थापनेच्या पवित्र दिनी नवीन रूपी प्रत्यक्ष पालखीत विराजमान करण्यात येणार आहेत.
या पवित्र धार्मिक उत्सवास आर्थिक साहाय्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. रुपी घडविणे, प्राणप्रतिष्ठा य इतर धार्मिक विधी आपल्या सर्वांच्या मातेवरील श्रद्धेमुळे व सहकार्याने अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले जातील याची आम्हांला पूर्ण खात्री आहे. सदर धार्मिक सोहळ्यास यथाशक्ती सहकार्य करण्याची विनंती मंदिर व्यवस्थापन समितीने ग्रामस्थ, चाकरमानी, माहेरवाशिणी आणि भाविकांना केली आहे.
सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन सर्व समावेशक असा हा धार्मिक सोहळा सर्वाच्या सहकार्याने व सहभागाने पार पाडण्याचा व्यवस्थापन समितीचा संकल्प आहे. या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या पिढीस लाभणार आहे. आपण वरील दिनी सहकुटुंब, आप्तेष्टांसह या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून कुलदैवत व ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यावा. आपली देणगी जरी ऐच्छिक असली तरी आपली सर्वांची उपस्थिती मात्र प्रार्थनीय आहे, हेच आग्रहाचे निमंत्रण, असे ग्रामस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

