बातम्या

१५ एप्रिलला रत्नागिरीत सकल हिंदू समाजातर्फे होणाऱ्या हिंदू गर्जना मोर्चाच्या नियोजनाची बैठक संपन्न..


रत्नागिरी – रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजातर्फे शनिवार, १५ एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी ४ वाजता सुरुवात होणाऱ्या हिंदू गर्जना मोर्चाच्या नियोजनाची बैठक शहरातील मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हच्या सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकीला विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्था आदींचे १०० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मोर्चाच्या प्रसार, प्रसिद्धी आदींचे सखोल नियोजन करण्यात आले.
हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. श्री. राऊळ म्हणाले की, आज स्वतंत्र भारतामध्ये हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने रत्नागिरी येथे शनिवार, १५ एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी ४ वाजता हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ, मारुती मंदिर येथे होऊन जयस्तंभ बाजारपेठ मार्गे मोर्चाची सांगता स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, रत्नागिरी येथे होणार आहे. या मोर्चाला हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. धनंजयभाई देसाई हे संबोधित करणार आहेत.

जाहिरात…


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे म्हणाले की, या मोर्चाचा प्रसार रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तसेच लगतच्या तालुक्यामधील गावांमध्येही करण्यात येणार आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणा एका संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला नसून समाजातील सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चाच्या प्रसारात आणि प्रत्यक्ष मोर्चात सर्व हिंदू बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. नलावडे यांनी केले. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तालुका आणि लगतचे तालुके यांमधील प्रसाराचे नियोजन करण्यात आले. मोर्चाची माहिती सर्व हिंदू बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध ठिकाणी प्रसार बैठका घेण्यात येणार असून होर्डिंग्ज, फ्लेक्स फलक, भित्तीपत्रके, वाहनांद्वारे अनाउन्समेंट, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातूनही मोर्चाची माहिती पोचवण्यात येणार आहे. मोर्चामध्ये भगवेध्वज, हस्तफलक आदींचाही समावेश असणार आहे. मोर्चाला येणाऱ्या ग्रामीण भागातील हिंदूंसाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मोर्चासाठी तसेच त्याच्या प्रसारासाठी आवश्यक असणारे साहित्य, वाहने, प्रसार आदींची पूर्तता करण्यासाठी दानशूर हिंदूंनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासह सर्व हिंदू बंधूभगिनींनी जात-पात, पक्ष, संप्रदाय, संघटना आदी भेद बाजूला ठेऊन हिंदूहितासाठी, तसेच हिंदूंच्या आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.
आजच्या बैठकीला सर्वश्री चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, संजय जोशी, श्रीरंग प्रभुदेसाई, राजू तोडणकर, गजानन करमरकर, दीपक देवल, मंदार देसाई, हिमांशु देसाई, तेजस साळवी, गणेश गायकवाड, दीपक जोशी यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!