राजापूर – (प्रमोद तरळ) भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सुरु आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अश्या विविध योजनांसंदर्भात रथातील स्क्रीनवर व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात आहे. काही योजनांतील लाभार्थ्याना लाभाचे वाटप केले जाते. थोडक्यात ‘केंद्र सरकार आपल्या दारी’ असा हा उपक्रम आहे. सदर रथ प्रत्येक दिवशी दोन गावात प्रवास करीत असून प्रत्येक गावी तीन तास असतो, गावात विविध रहदारीच्या ठिकाणी फिरवला जातो. सदर रथ यात्रेचे सकाळी एक गाव १०.०० ते १.०० आणि दुसरं गाव दुपारी २.०० ते ५.०० वा. असे नियोजन आहे.
सदर रथ गावात पोहचण्यापूर्वी सामाजिक संस्था,सर्व राजकीय पक्ष, सरपंच, ग्रामसेवक व सामाजिक कार्यकर्ते नागरिकांमध्ये जागरूकता केल्यास त्याचा जनतेला ऊत्तम लाभ होईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाडी वस्त्यामध्ये विकसित संकल्प यात्रेचा प्रचार करण्याच्या प्रशासनाकडून सूचना आहेत.विकसित संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनांची एकाच ठिकाणी रितसर माहिती मिळेल तथा काहीना योजनांचा थेट लाभ मिळेल. सदर उपक्रम कोणत्याही विशेष राजकीय पक्षाचा नसून केंद्र सरकार उपक्रम आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षानी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पोहचणार असून केंद्रसरकारच्या या महत्वकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेचा जनतेने लाभ घ्यावा गोरगरीब जनतेचे निश्चित कल्याण होईल असे मत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या राज्य स्तरीय दिशा समितीचे सदस्य संतोष गांगण यांनी व्यक्त केले. दखल न्यूज महाराष्ट्र.