देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात देवरुख परिसरातील अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय अनिवासी ‘स्वयंसिद्धता कार्यशाळेचे’ आयोजन स्पर्शज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक स्वागत थोरात, सहाय्यक प्रशिक्षका स्वरूपा देशपांडे, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, यूयुत्सु आर्ते, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी स्वागत थोरात, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वयंसिद्धता कार्यशाळेमध्ये अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करून आपले आयुष्य सुलभ व सहज जगता यावे यासाठी गेली २५ वर्षे यासंबंधीचे कार्य करणाऱ्या स्वागत थोरात यांनी स्वविकसित केलेल्या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून प्रशिक्षणार्थीना विविधांगी माहिती देण्यात आली. यामध्ये पांढऱ्या काठीचा वापर कसा करावा, पायऱ्यांची रचना व पायऱ्यांची चढ-उतार कसा करावा, स्वतंत्रपणे रस्त्यावर पांढऱ्या काठीच्या सहाय्याने सुरक्षितपणे कसे चालावे, विविध फळे व भाज्या स्पर्श व वासाने कशा ओळखाव्यात, रोजच्या वापरातील स्वयंपाक घरातील धान्यें, कडधान्यें तसेच इतर खाद्यपदार्थ गंध व स्पर्शाने कसे ओळखावीत, विविध दिशांची ओळख, विविध शारीरिक व्यायाम व बौद्धिक खेळ, स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी करायचे व्यायाम, इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने करायचा वापर, दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाण्यासाठीच्या युक्त्या व मार्ग यांचा समावेश होता. सर्व प्रशिक्षणार्थींना माहिती व प्रात्यक्षिकांच्या आधारे नाविन्यपूर्ण उपयुक्त कार्यपद्धती समजावून सांगितल्या. प्रशिक्षणार्थीना स्वागत थोरात व स्वरूपा देशपांडे यांनी उपयुक्त माहिती व प्रात्यक्षिकांद्वारे कृतींच्या साह्याने प्रशिक्षणार्थींकडून कृती करून घेतली. कार्यशाळेचे व्यवस्थापन रेवा कदम यांनी पाहिले.
कार्यशाळेच्या समोरापाप्रसंगी व्यासपीठावर स्वागत थोरात, स्वरूपा देशपांडे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, निवृत्त मुख्याध्यापिका सौदामिनी जोशी, मंजिरी जोशी, रेवा कदम यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेविषयी सहभागी प्रशिक्षणार्थीनी आपले अभिप्राय व आभार व्यक्त केले. यामध्ये संस्कृती ब्रिद, यश देवरुखकर, राजेश पार्वते, संतोष माने, अमेय पंडित, गोविंद पांचाळ यांचा समावेश होता. त्यानंतर ब्रेल लिपी मधील स्पर्शज्ञान दिवाळी २०२२ ‘माझे स्वातंत्र्य विशेषांक’ संपादक स्वागत थोरात यांनी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांना भेट दिला. या अंकातील संपादकीय भागाचे महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती ब्रीद हिने वाचन केले. उपस्थित प्रशिक्षणार्थी व पालकांसोबत स्वागत थोरात, सौदामिनी जोशी, डॉ. तेंडोलकर यांनी संवाद साधला. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. सुनील सोनवणे, प्रा. धनंजय दळवी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.
फोटो- १. कार्यशाळेत सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी, पालक, स्वयंसेवक, मार्गदर्शक व इतर मान्यवर.
२. ब्रेल लिपीतील दिवाळी अंकाचे वाचन करताना समृद्धी ब्रीद आणि उपस्थित मान्यवर.
छाया- प्रा. धनंजय दळवी.
दखल न्यूज महाराष्ट्र..