'शिक्षणतज्ञ कै. रामभाऊ परुळेकर आणि मुख्याध्यापक कै. बाबुराव परुळेकर शैक्षणिक कार्य पुरस्कार: २०२३' करीता देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पर्शुराम तेंडोलकर यांची निवड झाली आहे. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यावतीने प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २५ जून, २०२३ रोजी मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यकर्तुत्वासाठी या पुरस्कारांने सन्मानित केले जाणार आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची धुरा ६ डिसेंबर, २००७ पासून आजपर्यंत यशस्वीपणे सांभाळली आहे. सन २००९-१० मध्ये महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले होते. सन २०१४-१५ मध्ये प्राचार्य तेंडोलकर यांना त्यांच्या उत्कृष्ट अध्ययन कार्यासाठी मुंबई विद्यापीठाने 'उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार' देऊन सन्मानित केले होते. तर सन २०१५-१६ मध्ये महाविद्यालयाला 'सर्वोत्कृष्ट एनएसएस युनिट पुरस्कार' देण्यात आला होता. महाविद्यालयाला नॅकने मार्च २०१६ मध्ये 'अ' दर्जा बहाल केला, यूजीसी व मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये स्वायत्त दर्जा (Autonomous Status) बहाल केला. प्राचार्य तेंडोलकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे प्रभारी संचालक म्हणून ४ जुलै, २०१८ ते १२ जानेवारी, २०२० पर्यंत कार्यभार सांभाळला. विद्यापीठाच्या विविध कमीट्यांवर तसेच विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून विविध महाविद्यालय व आस्थापनांमध्ये भेटी दिल्या आहेत. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात चमकदार प्रगती केली आणि या यामुळेच महाविद्यालयात नवनवीन शैक्षणिक दालने निर्माण होऊ शकली.
दखल न्यूज महाराष्ट्र.
