उमेदवारी देताना सर्व बाबींचा विचार करूनच दिली जाणार…
मुंबई :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसताना भारतीय जनता पक्षाकडून मात्र नियोजनाला सुरुवात झाली आहे. प्रदेश पातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांपैकी ३० टक्के जणांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक आले आहे. त्यामुळे यातील अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचेच संकेत, या सर्वेक्षण अहवालातून मिळाले आहेत.
महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी भाजपाने सर्वेक्षण सुरू केले असून माजी/विद्यमान लोकप्रतिनिधी पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांमध्ये किती सहभाग घेतात, लोकांचे यांच्या बाबतचे मत काय आहे. त्याच चेहऱ्यांना संधी द्यावी की नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी याबाबत गुप्त सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यात मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून प्रदेश पातळीवर एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात सर्वच प्रभागांतील माजी नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. तसेच सध्याचे विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधींबाबत जनतेची मते काय हे जाणून घेतले. मात्र ३० टक्क्यांहून अधिक नगरसेवक जनतेत जाऊन कामच करत नसल्याची बाब त्यातून समोर आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांनादेखील धक्का बसला आहे. अशाच पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाला लोकसभेत फटका बसला होता. ही बाब पक्षाकडून गंभीरतेने घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाकडून आणखी दोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे व त्याच्या आधारावरच तिकीट वाटप केले जाणार आहे. मात्र यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी देण्याकडे भाजपाचा कल असल्याचे दिसत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
