चिपळूण:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील टेरव येथील जागृत आणि स्वयंभू कालिका मातेचा समा त्रैवार्षिक जत्रोत्सव बुधवार ३ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत लाट देणारे श्री गजानन सीताराम मेंगे, तांबडवाडी हे २ एप्रिल रोजी लाटेच्या वृक्षाची यथासांग पूजा करतील. दत्तावाडीतील श्री खापरे हे त्या वृक्षावर पहिली कुऱ्हाड चालवतील, त्यानंतर विश्वकर्मा समाजातील बांधव लाट तोडतील. तद्नंतर सर्व गावकरी सदर लाट गुलाल उधळत ढोलताशांच्या गजरात नाचवत मंदिराजवळ असलेल्या लाटेच्या स्तंभाजवळ २ एप्रिल रोजी रात्रौ आणतील. हा लाट नाचविण्याचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
समा या जत्रेच्या दिवशी रात्रौ १२ वाजता कालिका मातेच्या स्वयंभू मूर्तीला मूळ जागेवरुन बाहेर काढून स्नान-संध्या घालून विधीवत पूजा करण्यात येईल. कालिका मातेच्या चरणाखाली तिचे देणे-मागणे देण्यात येईल व मूळ स्थानावर प्रस्थापित करण्यात येईल. यावेळी गावात निरव शांतता असते. सदर विधिवत पूजा देवस्थानचे पुजारी, कुंभार समाजाचे साळवी बांधव पार पाडतीली.
सम्याच्या जत्रेच्या दिवशी दुपारी लाट चढविण्याच्या विधीस सुरुवात करण्यात येईल. गावातील विश्वकर्मा समाजाचे बांधवानी लाटेस योग्य आकार देतील . ३०.५ फूट लांब असलेली लाट महत् प्रयासाने लाटेच्या स्तंभावर चढविण्यात येईल. लोटे परशुराम येथे वास्तव्यास असलेले श्री. लोटेकर हे उपवास करुन सूर्चिभूत होऊन या धार्मिक विधीत सहभागी होतील. देवस्थानाच्या दोन्ही मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करुन सम्याची सुरुवात करण्यात येईल. देवीचे देणे मागणे दिल्या नंतर लाटेच्या खांबाच्या दोन्ही टोकांना बांधलेल्या दोरखंडाने लाटे बरोबर श्री लोटेकर हे ग्रामस्थांसह तीन प्रदक्षिणा घालतील. सुहासिनी पालखीत ओट्या भरतील.
जत्रेनिमित्त प्रसाद, खेळणी, अल्पोपहार, थंडपेय अशी विविध प्रकारची दुकाने थाटली जातील. सदर लाट गुढीपाडव्याला मंगळवार दिनांक ९ एप्रिल, २०२४ रोजी विधिवत पूजा करून संध्याकाळी उतरविण्यात येणार आहे.
समा जत्रेस उपस्थित राहून सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे
.