थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात एन. एस. एस. (+2स्तर) विभागाकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह उपप्राचार्य डाॅ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी गायत्री रामाणे या विद्यार्थिनीने महाराजांचे बहुजन समाजासाठीचे कार्य, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, राधानगरी धरणाची निर्मिती यासंबंधी सविस्तर आढावा घेतला. ऋतुजा पवार हिने व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून व्यसनांचे दुष्परिणाम व व्यसन मुक्तीची आवश्यकता यावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक करून शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी कसे आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. मा. पोलीस अधीक्षक, जिल्हा रत्नागिरी यांच्या आवाहनानुसार अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 'व्यसन मुक्ती' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. निवडक निबंध स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी पाठविण्यात आले. अभिवादन कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा शेट्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, डाॅ. मयुरेश राणे, प्रा.अभिनय पातेरे यांनी विशेष प्रयत्न केले.
फोटो- राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, प्रा. लुंगसे, प्रा. सौ. शेट्ये, प्रा. जाधव.
छाया- प्रा धनंजय दळवी. दखल न्यूज महाराष्ट्र
