लेखन : ( हर्ष सुरेंद्र नागवेकर.. रत्नागिरी)
लिखाणाच्या सुरुवातीलाच लेखाच्या शीर्षका विषयी जरा थोडक्यात सांगतो. आज 14 मे म्हणजेच जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणून साजरा केला जातोय. आज सगळ्यांच्या व्हाट्सअप फेसबुक, इंस्टाग्राम किंवा थोडक्यात काय तर सोशल मीडिया अकाउंट वरती पाहिलात तर सगळीकडे अनेकांच्या आपले आई सोबतचे फोटो असलेले पोस्ट स्टोरीज स्टेटस हे दिसायला मिळतील. प्रत्येक जण आज आपल्या आई विषयीचे प्रेम काहीजण शब्दात, भाषेत तर काहीजण फोटोज द्वारे व्यक्त करत आहेत. आणि यामध्ये आजची सध्याची पिढी जरा पुढे दिसत आहे. म्हणजे जर सरासरी विचार केला तर सन 2000 च्या पुढचा जन्म असलेली पिढी शक्यतो.
आणि मग यांचे स्टेटस पाहिल्यानंतर सुरुवात होते, काहींचे वैचारिक लेख, विचार प्रसारित होण्याची. आणि तेही, लेख कसले? तर मदर्स डे किंवा फादर्स डे हा एखादा दिवशी आपण फक्त साजरा करतो, आई-वडिलांसोबतचे फोटो स्टेटसला ठेवतो . आणि आई वडिलांना मात्र आश्रमात ठेवतो . आई-वडिलांचे प्रेम फक्त एका दिवसापुरता व्यक्त करण्यासाठी नसतं आणि अशा असंख्य विचारांचा भडीमार सोशल मीडियावर लगेच दुसऱ्या दिवशी पडायला सुरुवात होते.
ते बोलतात ,लिहितात ते काही चुकीच आहे असं नाही. अगदी बरोबर आहे. कारण आजची पाश्चिमात्य संस्कृती पाहिली किंवा वाढत्या वृद्धाश्रमांचा आकडा पाहिला की असा विचार होणं आणि करणं साहजिक आहे.
पण याचा अर्थ असा नव्हे की सध्याच्या या पिढीचा तो एक दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करणं चुकीचं आहे.
मुळात एक जागतिक सत्य आहेे, ते म्हणजे, प्रत्येक मुला मुलीचं आपल्या आई वडिलांवर अतिशय प्रेम असतं. लहानपणी त्यांच्या कुशीत झोपण्यापासून, अंगा खांद्यावर खेळण्यापर्यंत, आणि त्यानंतर मोठ होता होता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, हे न सांगता येण्यापर्यंतचा प्रवास हा प्रत्येक मूल आपल्या आयुष्यात पार करत असतंच. हा प्रवास असा कसा? आणि का होतो? त्याचे उत्तर या जगात खरंतर कोणाकडेच नाहीये. पण तो होतो हे मात्र खरं. आई-वडिलांजवळ हट्ट करू शकतो, बोलू शकतो ,अनेकदा भांडू सुद्धा शकतो, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे सांगायला शब्दांची जुळवाजवळच करता येत नाही. एवढेच कशाला, मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर मुलाने बापाला मिठी मारली असा प्रसंग किती जणांनी पाहिला आहे ? फार क्वचित.
मग सध्याच्या जगात ही परिस्थिती असताना , जगाने आई-वडिलांसाठी एखादा स्पेशल दिवस ठरवून दिला असेल, तर मग तो त्या पद्धतीने सेलिब्रेट करायला काय हरकत आहे?
म्हणजे मनात प्रेम आहे ते वर्षभर नाही दाखवता आलं तरी, तो एक दिवस ठरलेला आहे ना ,मग त्यादिवशी आमच्यासारखी या पिढीतली मुलं फोटो स्टेटसला ठेवून किंवा काहीतरी लेख लिहून आपल्या आई-वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करत असतात, आपलं प्रेम दाखवत असतात. ते कदाचित इतर दिवशी दाखवताना थोडा संकोचितपणा येतो अनेकदा. पण या ठरवून दिलेल्या दिवशी मात्र एक मोकळीक असते . हा विचार असतो की , हा दिवस फक्त आईचा किंवा वडिलांचा आहे. या दिवशी आपण मुक्तपणे बोलू शकतो, लिहू शकतो किंवा व्यक्त होऊ शकतो.
हा म्हणजे…या पिढीतली ही एक निराळी किंवा जुन्या पिढीतल्या लोकांना कदाचित न समजणारी पद्धत असू शकेल. पण पद्धत आहे हे मात्र खरं . आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.
कारण ज्याप्रमाणे वर्षातून एकदाच बर्थडे येतो. तो खूप आपण आनंदाने साजरा करतो ना? वर्षभर त्याचा उत्सव साजरा करत नाही ,पण त्या एक दिवशी मात्र खूप धमाल करतो.
हा मदर्स डे सुद्धा तसाच आहे. वर्षभर आपल्यासाठी घरासाठी सर्व काही करणाऱ्या आईसाठीचा स्पेशल दिवस. मग आपल्या भावना व्यक्त करणे हे आपलं कर्तव्यच आहे असं मी म्हणेन.
आणि उरला मुद्दा उद्या प्रसारित होणाऱ्या लेखांचा. म्हणजेच वाढत्या आश्रमांचा मुद्दा. तर मला असं वाटतं, आजची आमची पिढी स्टेटसला आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटोज किंवा आमचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहोत, ते बघून तरी आपल्या आई-वडिलांना आश्रमात ठेवणाऱ्या माणसांना लाज वाटेल .आपण कोणतं स्वर्गसुख लाथडत आहोत, याचा पश्चाताप होईल आणि त्यांच्या चुकांची जाणीव होऊ शकेल हा सुद्धा एक पॉझिटिव्ह विचार झाला पाहिजे.
आपल्या पिढीच्या बाजूने लिखाण करत आहे याचा अर्थ असा नव्हे की आपण सर्वस्वी योग्य आहोत. कारण आज मदर्स डे वगैरे सेलिब्रेट करून उद्या त्याच आईला उलट बोलून किंवा आईशी भांडून आपण आपल्या बाबू शोनाला भेटायला जाणार आहोत. मग काय फायदा एक दिवसीय दिखाऊ मातृप्रेमाचा?
कारण मान्य आहे एक दिवस आईसाठी किंवा वडिलांसाठी स्पेशल आहे तो सेलिब्रेट करायला हवा पण याचा अर्थ असा नव्हे की ,उरलेले वर्षाचे 364 दिवस तुम्ही उर्मटपणे त्यांच्याशी वागाल , त्यांना दुःख होईल किंवा त्यांच्या संस्कारात काही कमी राहिली का ? हा प्रश्न त्यांना पडेल अशी आपली वागणूक असेल… आणि अशी आपली वागणूक असणार असेल तर आजचा दिवस साजरा करण्याचा आपल्याला अधिकार नाही.
मित्रहो खरंतर सध्या आपलं असलेलं हे किशोरवयीन किंवा तारुण्यवस्थेतलं वय हे प्रचंड गडबडीत किंवा आपल्यासाठी एक स्ट्रगलिंग एज आहे असं म्हणता येईल. यावेळेस खरंतर सकाळी लवकर उठून डबा बनवून तुमची तयारी करून तुम्हाला कॉलेजला किंवा ऑफिसला पाठवण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर नीट नेटकं राहता यावं यासाठी तुमचे कपडे धुण्यापासून ते तुमचा मूड चांगला राहावा यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवण्यापर्यंतचा प्रवास करत असताना खरंतर या वयात आई आणि आपण या नात्यातला संभाषणाचा संपर्क खरं तर कमी होत असतो. पण आपण आपल्या आयुष्यात खूप सक्सेसफुल व्हावं, यासाठी खरंतर आपल्या आई-वडिलांचा तो अट्टहास असतो. बऱ्याचदा आपण स्ट्रगलिंग साठी बाहेरच्या शहरात जाण्याचा देखील निर्णय घेतो. अशा वेळेस आपल्या भविष्याच्या दृष्टीने आपले आई-वडील आपल्या काळजाचा तुकड्या पासून पण दूर राहण्यास नाईलाजाने तयार होतात. आणि याच आपल्या स्ट्रगलिंग पिरेड मध्ये आपल्याला एक बाहेरचा आपला कम्फर्ट आपल्याला अनेकदा मिळतो. बराच वेळ आपण बाहेर असल्यामुळे त्या एका व्यक्तीसोबत कदाचित खूप छान वाटतं देखील. पण हे वाटत असताना आपण आईला विसरू लागलो असलो तर आपल्या जगण्यातला गंध आणि अर्थ हरवत चाललो आहोत हे कायम लक्षात ठेवायला हव…
आपल्याच पिढीतला आपलाच सखा म्हणून आजच्या मदर्स डे निमित्त माझा हा खास सल्ला..
♥️happy mother’s day♥️ ✒️हर्ष सुप्रिया सुरेंद्र नागवेकर

