देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी कोंडगाव-साखरपा येथील निवासी श्रमसंस्कार शिबिरामध्ये विविध प्रकारच्या कामाद्वारे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. काजळी नदीवर विद्यार्थ्यांनी नुकतेच १०० फूट लांब व ५ फुट उंचीच्या २ बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. यासाठी सरपंच प्रियांका जोयशी आणि ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, ग्रामसेवक, ग्रामस्थ व व्यापारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्वयंसिध्दा फाउंडेशनच्या संस्थापिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांनी काजळी नदीवरील विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना जल संवर्धनाचे महत्व व उपयुक्तता याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थी स्वयंसेवकांनी या निवासी श्रमसंस्कार शिबिरात कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे आणि सहाय्यक अमोल वेलवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियानांतर्गत बीएसएनएल कार्यालय परिसर, ग्रामपंचायत कोंडगाव परिसर व बस स्टॅन्ड पर्यंतचा दुतर्फा रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा, जि. प. शाळा नं. २, निर्मल ग्रामपंचायत साखरपा परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि मुर्शी पोलीस चेक नाका या ठिकाणी साफसफाई केली. डी. के. कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूल व कबनूरकर हॉल तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र, साखरपा येथील परिसराच्या स्वच्छतेसह परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी पाण्यासाठी अळी व झाडांना आधार देण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी केली. मूर्शी पोलीस चेक नाका येथील परिसर स्वच्छतेच्या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना 'प्रसार माध्यमांचा वापर व घ्यावयाची काळजी' यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रसार माध्यमांच्या वापरातून सहज व अनवधानाने होणाऱ्या चुका व त्याचे गंभीर दुष्परिणाम याबाबत सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता विकासाला प्रेरणा देण्यासाठी क्षेत्रभेटी अंतर्गत काजू फॅक्टरीला भेट देऊन प्रक्रिया कार्य व विपणन व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. या निवासी श्रमसंस्कार शिबिराला अनेक मान्यवर व्यक्तींनी भेट देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. या शिबिराच्या उत्तम आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो- काजळी नदीवर बंधारा बांधणारे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, ग्रामस्थ व अधिकारी.
छाया- प्रा. प्रवीण जोशी.