बातम्या

जेएनयु विद्यापीठात लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करण्याची रत्नागिरीतील सकल हिंदु ब्राह्मण आणि वैश्य समाजाची मागणी.

रत्नागिरी – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य समाजाला देश सोडण्याच्या, रक्तपात घडवण्याच्या, बदला घेण्याच्या धमक्या देणारे लिखाण करून संविधानविरोधी कृत्य करणाऱ्या संबंधितांचा शोध घेऊन त्यांना विद्यापीठातून कायमचे निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल १२ डिसेंबर २०२२ या दिवशी रत्नागिरी शहरातील आजगावकरवाडी येथील विश्‍व हिंदु परिषदेच्या जिल्हा कार्यालयात सकल हिंदु ब्राह्मण आणि वैश्य समाज यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत वैश्य समाजाचे प्रतिनिधी श्री. अभय दळी, अखिल चित्पावन ब्राह्मण संघ रत्नागिरीचे कार्यवाह श्री. राजन पटवर्धन, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह व ज्ञाती गृह निधी संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद जोशी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे यांनी संबोधन केले.
        दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) भिंतींवर ‘ब्राह्मणांनो भारत सोडा’, ‘ब्राह्मणांनो विद्यापीठ सोडून निघून जा’, ‘ब्राह्मणांनो-बनियांनो (वैश्यांनो) आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत’, ‘आम्ही बदला घेऊ’, ‘रक्तपात घडेल’, ‘गो बॅक टू शाखा’, अशा जातीद्वेषवाचक आणि रक्तपाताच्या धमक्या देणाऱ्या घोषणा लिहून सामाजिक अशांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटक आणि माथेफिरू यांचा सकल हिंदू ब्राह्मण आणि वैश्य समाज, रत्नागिरी जाहीर आणि तीव्र शब्दांत निषेध करत आहे. हिंदु समाजात फुट पाडण्यासाठी केलेला हा हिंदु धर्मावरील आघात आम्ही सहन करणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे यांनी केले.
       विद्यापीठात शिकणाऱ्या आणि हिंदु समाजाचा घटक असणाऱ्या ब्राह्मण तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना टारगेट केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापीठामार्फत घेण्यात यावी. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्याची माहिती जनतेसमोर त्वरित खुली करण्यात यावी, अशी मागणी वैश्य समाजाचे प्रतिनिधी श्री. अभय दळी यांनी केली.
       या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी, सनातन संस्थचे श्री. हनुमंत करंबेळकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. दिपक जोशी, अधिवक्ता सचिन रेमणे, पतंजली योग समितीचे अधिवक्ता विद्यानंद जोग, गो सेवा संघाचे श्री. गणेश गायकवाड, श्री. चंद्रकांत राऊळ, तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना आणि ब्राह्मण व वैश्य समाजाचे ज्ञाती बांधव उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!