रत्नागिरी – भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या चार तालुक्यात १७ सरपंच आणि १८८ सदस्य विजयी झाले आहेत. बहुतेक सर्व ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा किमान एक सदस्य निवडून गेला आहे. भाजपाची कामगिरी उंचावत आहेत, अजूनही पुढील निवडणुकांमध्ये यश मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नाही. परंतु भाजपाचे सदस्यत्व घेतलेले अनेक सदस्य निवडून आले आहेत. चार तालुक्यांत १७ सरपंच थेट निवडून आले असून १८८ सदस्य विजयी झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यात ४ ग्रामपंचायतीमध्ये भाजपा सरपंच विजयी झाले. ५८ सदस्य निवडून आले. राजापूरमध्ये पाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडून आले, ४० सदस्य विजयी झाले. लांज्यामध्ये तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच विजयी. संगमेश्वरमध्ये पाच सरपंच विजयी झाले. याबाबत अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेला भक्कम पाठिंबा व मार्गदर्शन आणि भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट यामुळेच एक चांगले यश भाजपाला मिळत आहे. भाजपाने बहुतांश ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली. काही अपवादात्मक गावामध्ये युती करून आपण निवडणूक लढलो, भाजपाचे जिल्हास्तरापासून ते बूथ स्तरापर्यंत सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतल्याने यश साकार झाले आहे. तालुकाध्यक्षांनीही लक्ष घातले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अपेक्षेप्रमाणे दृढसंकल्पित राहात पुढील वाटचाल यशस्वी करूया. भाजपा एकसंधपणे पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार आहे. सर्व जुने नवे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समन्वयातून एक अभेद्य राजकीय ताकद उभी करायची आहे. ही ताकद उभी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय होत पक्ष कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ या बराच काळ दूर राहिलेले विजयाचे स्वप्न साकार करूया, असे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.
*दखल न्यूज महाराष्ट्र*