रत्नागिरी : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड राज्यात अव्वल असते. मग स्पर्धा परीक्षेमध्ये कोकणातीत मुले मागे का पडतात याचा विचार करणे गरजेचे आहे. कोकणातील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. अशा व्याख्यानमालांमधून शालेय जीवनापासून जर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये जागृती झाली तर निश्चितच आपण स्पर्धा परीक्षांकडे वळू शकतो. शासकीय अधिकारीच नव्हे तर अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्येही तुम्हाला परीक्षेला सामोरे जावे लागते. अशावेळी आपण जर दररोज वर्तमानपत्र वाचत असाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये निश्चित भर पडत जाईल असे उदगार रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी काढले. ते आज रा.भा.शिर्के प्रशालेतील रंजन मंदिरमध्ये आयोजित ‘बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने’ या व्याख्यानमालेत बोलत होते.
द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ‘बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने’ या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आज गुंफले गेले. यावेळी प्रमुख वक्ते तहसीलदार शशिकांत जाधव यांचा शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे वरिष्ठ शिक्षक के.डी.कांबळे, पुनम पवार, द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण रत्नागिरीचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे, कोकण संपर्क प्रमुख अजय बाष्टे, तालुका सचिव पुर्वा किणे, छायाचित्रकार संदेश पवार उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेसाठी वाचन महत्वाचे
नोकरीसाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेतून जावे लागते. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही पदे युपीएससी परीक्षेतून भरली जातात तर अन्य अधिकाऱ्यांची पदे एमपीएससी परीक्षेतून भरली जातात. इतर जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यात आठवीपासूनच मुले युपीएससी, एमपीएससीचा सराव करणे सुरु करतात. आपण पदवीधर झाल्यानंतर या स्पर्धा परीक्षेकडे वळतो. त्यामुळे त्यांच्या तयारीत आणि आपल्या तयारीत खूप फरक पडतो. म्हणून आतापासूनच तुम्ही वर्तमानपत्रे वाचू लागलात तर तुमची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी होईल असे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, वर्तमानपत्रे वाचल्यामुळे आपल्याला जिल्हा, राज्य, देश आणि विदेशात काय घडतंय याची माहिती मिळते. स्पर्धा परीक्षा विविध विषयांवर आधारीत असल्या तरी ताज्या घडामोडीवर आधारीत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण दररोज वर्तमानपत्र वाचले तर आपल्याला ताज्या घडामोडींची माहिती होते. मग त्याचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशनने स्पर्धा परीक्षावर व्याख्यानमाला आयोजित करून एक चांगली मोहिम हाती घेतली आहे. उद्या तुमच्यातूनच स्पर्धा परीक्षा देऊन विद्यार्थी अधिकारी घडतील तेव्हा या व्याख्यानमालेचे यश मानले जाईल. आम्ही दोन दिवस ही व्याख्यानमाला राबवत आहोत. त्याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचेही तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.

