प्रतिनिधी : निलेश आखाडे.
रत्नागिरी – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस झालेला विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुंबई गोवा महामार्ग चौपादरिकरणाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. त्यानंतर रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महामार्गाचे कोकण वासिय यांचे स्वप्न जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा विश्वास दिला. त्यांचा हा विश्वास जपण्याची जबाबदारी चौपदरिकरणाचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या हाती आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. कोकण वासीयांचे हे स्वप्न आम्ही लवकरच पूर्ण करणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
