राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
चिपळूण (ओंकार रेळेकर) काँग्रेसचे नेते व माजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात सोमवारी (ता. 19) सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना श्री. यादव म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेसचा जुना काळ पाहिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता देशाला काँग्रेसची, काँग्रेसच्या विचारधारेची आणि काँग्रेसच्या संस्कृतीची गरज आहे. काँग्रेसचे विचार घरोघरी पोहचविण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. ज्येष्ठांना काँग्रेसचे महत्त्व माहित आहे. ते कायमच काँग्रेससोबत आहेत. हे ज्येष्ठ नागरिकच काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना छत्र्यांच्या माध्यमातून सावली देण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक व रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेशशेठ राऊत, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा चिटणीस सयाजी पवार, सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष अ. ल. माळी, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत ऊर्फ कांता चिपळूणकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते. दखल न्यूज महाराष्ट्र
